#policebharti2024 एकच पुस्तक आणि पोलीस भरती 2023-24 क्लिअर ?

मित्रांनो, एकच पुस्तक आणि पोलीस भरती / #policebharti2024 क्लिअर ? हे लेखाचे शीर्षक वाचून आपल्‍या मनात विचार आला असेल की, असं कोणतं मॅजिक बुक इथे आपल्याला सांगितलं जाणारयं ? तर….

मध्यंतरी काही मुलं-मुली अर्थात पोलीस भरती आणि इतरही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी, करू इच्छिणारी, अभ्यासाच्या या क्षेत्रात काहीशी नवी असणारी….येऊन भेटली…. त्यांच्याशी झालेली चर्चा… ही या लेखामागची प्रेरणा…!

school 3666924 1920 1

पोलीस भरती Book-List एक  नवीन ट्रेंड…..

या विद्यार्थी मित्रांनी, त्यांच्या #policebharti2024 साठी मोबाइल पीडीएफ मधील पोलीस भरती परीक्षेसाठीच्या अनेक Book-List  दाखवल्या (त्यामध्ये काही पुस्तके अस्‍मादिकांचीही होती..!) आणि यापैकी कोणती बुकलिस्ट फायनल करावी ? हा त्‍यांना भेडसावणारा गहन प्रश्न होता.  त्‍याचे निराकरण त्‍यांना हवे होते. त्‍याचवेळी हा ही आग्रह होता की, मी प्रत्‍येक विषयाचे एकच फार-फार तर दोन पुस्तके सांगावीत; त्यापेक्षा एकही अधिकचे नको. कारण तसे त्‍यांना अनेकांनी सूचविले होते ..!

पोलीस भरती फक्‍त एकच पुस्तक….

आज-काल फक्‍त एकच पुस्तक आणि पोलीस भरती क्लियर हा ट्रेंड वाढतोय किंबहूना वाढवला जातोयं. त्‍यामागचा उद्देश काय आहे हे उघड गुपित आहे. असो…

एकच पुस्तक आणि परीक्षा क्लिअर….तीही  पोलीस भरती सारखी आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा…!! जिथे परीक्षेत आलेला प्रश्न अभ्यासक्रमातल्या कोणत्या घटकावर विचारला आहे हेच लक्षात येणे बरेचदा अवघड जाते; तिथे एकाच पुस्तकातून अभ्यास करून, परीक्षा क्लिअर करून, पद मिळणारच हा त्यांचा आत्मविश्वास पाहून मी विचारातच पडलो तरीही,

एकच पुस्तक वारंवार वाचन करून किंवा घोकून पाठ करून किंवा अभ्‍यासून हमखास यश…आणि तेही कोणीतरी सांगत आहे म्‍हणून मिळणारचं…. अशी काहीशी ‘ठोकळेबाज’ कल्पना मनी घट्ट करून आलेल्यांना इतर काही सांगणं कितपत रुचेल याबाबत मला शंका होतीच.

तरीपण, आपला थोडाफार अनुभव आणि विचारणार्‍यास पटो-न-पटो  आपल्‍याला जे प्रामाणिकपणे वाटतं ते त्‍यास सांगणं  आपलं काम आहे हे लक्षात ठेवून, मी त्यांना विचारलं की, दहावीपर्यंत प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम अधिकृतरित्‍या एकाच पाठ्यपुस्तकात सामावलेला असतो. त्या बाहेरचे प्रश्न येणार नाहीत हेही शंभर टक्के माहित असते. तर  त्‍यावेळी तुम्ही फक्त पाठ्यपुस्तकेच वापरली होती की, गाईड, अपेक्षित, वर्कबुक, शिक्षकांच्या नोट्‌स यांचाही वापर केला होता ?

त्‍यांच्या उत्तरावरून लक्षात आलं की, सर्वांनीच सर्व वापरलं होतं…

का आवश्यकता  भासली त्‍याची ?  त्यावेळी  तर एकच पुस्तक Textbook वापरणे अधिक सुरक्षित होते तरी पण ..?

कोणीच काही बोललं नाही…!

कारण तर उघड होत की, अधिकाधिक गुण मिळावेत या हेतूने; पाठ्यपुस्तकातून केलेला अभ्यास अधिक घट्ट व्हावा; त्याची खोली वाढावी; विषयाचे इतर पैलू लक्षात यावेत; म्हणून आपण त्या वेळी पाठ्यपुसतकां- व्यतिरिक्त इतरही संदर्भ वापरले.

पोलीस भरती ही तर स्पर्धा परीक्षा आहे….

आता ही तर स्पर्धा परीक्षा आहे. फक्त गुण नाही मिळवायचे; तर स्पर्धेत वरचे स्थान मिळवायचे आहे. तरच  निवडयादीत नाव येणार आणि आणि मगच आपले स्‍वप्न साकार होणार. अन्यथा वर्ष आणि वर्षभराची मेहनत वाय जाणार. अशावेळी एकाच पुस्तकाची घोकंपट्टी करून यश मिळविणे कसे शक्य होणार..? कदाचित माझे बोलणे त्‍यांना पटत असावे…

पाठांतर म्हणजे अभ्यास नाही. तो अभ्यास प्रक्रियेचा एक भाग आहे. अभ्यास केल्यानंतर म्हणजेच, त्या विषयाचे आकलन झाल्यानंतर, विषयाचा गाभा लक्षात आल्‍यानंतर, पाठांतर करून आणि वारंवार उजळणी करून आपल्या स्मरणात तो विषय अधिक घट्ट करत राहणे. त्‍या घटकावर अन्य प्रकारे ट्रिकी प्रश्न कशाप्रकारे विचारले जाऊ शकतात त्‍याचा मागोवा घेत राहणे गरजेचे असते.

स्पर्धा परीक्षांचा अभ्‍यास करताना जनरल नॉलेज-सामान्य ज्ञान अभ्‍यास घटकाबाबत उपलब्ध होणार्‍या नव्या माहितीचा वेध घेत राहून आपला अभ्‍यास अद्ययावत करत राहणे अनिवार्य असते. उदाहरणार्थ– व्याघ्र प्रकल्‍पांची संख्या, नवे व्याघ्र प्रकल्‍प, वारसा यादीतील स्‍थळे इत्‍यादी. मूळात ही परीक्षाच त्‍यासाळी असते. हे नाही केले तर यश आपल्यापासून कोसो दूर राहणार हे उघड आहे.

आजच्या डिजिटल युगात शेकडो बुकलिस्ट फिरणार. त्यांचा सोर्स देखिल आपल्याला कळणे शक्‍य नाही. ती खरीखोटी हे समजण्यास मार्ग नाही. त्यातही पुन्हा… एकच पुस्तक हा आग्रह आपला मौल्‍यवान वेळ वाया घालवणार आणि अपयश आल्‍यानंतरच आपण चूकलो हे आपल्‍याला समजणार… असे होऊ नये म्‍हणून..

#policebharti2024 दोन-दोन उत्तरतालिका….

सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायला हवं की, केवळ १०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका काढतानासुद्धा दोन-दोन उत्तरतालिका द्याव्या लागतात. म्हणजेच,  एखाद्या प्रश्नपत्रिकेतील विशेष संदर्भाचा वापर करून तयार केलेले प्रश्न व त्‍यांचे उत्तर….. त्यापेक्षा विश्वसनीय संदर्भाचा दाखला दिला तर परीक्षा यंत्रणेला बदलावे लागते. तर मग इकडून-तिकडून मुद्दे घेऊन तयार केलेले एकच गाईड वापरून शंभर टक्के यशाची खात्री कशी मिळेल..?  

#policebharti2024 मला काय वाटते….

आपल्या भविष्याशी आपणच का जुगार खेळावा ?  त्यापेक्षा काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली मोजकीच पुस्तके, विषयाचा पाया घालण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तके, आणि प्रत्‍यक्षात विचारले जाणारे प्रश्न सोडविता यावेत यासाठी उपलब्‍ध मराठी, हिंदी, इंग्रजी दर्जेदार संदर्भ अभ्यासून,  त्‍यातून नोट्स काढून अभ्यास केला तरच खर्‍या अर्थाने अभ्‍यासही होतो आणि आत्मविश्वास देखील वाढतो.  

अशाप्रकारे अभ्‍यास थोडा अधिक वेळ करावा लागला तरी कमी वेळात भरीव अभ्यास होतो. विषयाचं आकलन झालं की, घोकंपट्टीची  फारशी गरजच भासत नाही. परीक्षेत कशाही प्रकारे फिरवून प्रश्न आला तरी उत्तर देणे कठीण जात नाही.

लक्षात घ्या…! यशाची रेडीमेड किंवा मळलेली अशी वाट कधीच, कुठेच आणि कोणत्याही क्षेत्रात कोणासाठीही असत नाही. स्‍वत:ला सिद्धच करावे लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि योग्य दिशा यशाचा राजमार्ग तयार करण्यास मदत करतात.

यशासाठी श्रमाला पर्याय नसतो आणि अभ्यासाला शॉर्टकट असत नाही.

शाश्वत यशाचा एकच पासवर्ड, एकच सक्सेस की, एकच मास्टर की आणि एकच मंत्र तो म्हणजे योग्य दिशेने अथक प्रयास……

कारण अभ्यास….

संत तुकाराम महाराज म्हणतात,

असाध्य ते साध्य । करिता सायास ।

कारण अभ्यास।  तुका म्हणे ।।

मनुष्याला जे काही असाध्य वाटत असेल ते अथक प्रयत्नाने साध्य होते. याला कारण अभ्यास आहे. अभ्यासाचा अर्थ होतो,  आपले ईप्सित, आपले इच्छित साध्य होईपर्यंत अविरत प्रयत्नशिल राहणे. असे केले तरच अशक्‍यप्राय स्‍वप्ने साध्य होताना दिसतात. यशाची शिखरे सर होतात.

उगीचच अमुक Key, तमुक पासवर्ड असल्या गोष्टींनी यश मिळत नसते. कष्टाच्या पायावरच यशाची इमले उभारता येतात. नाही तर मनात मांडे खात राहायचे आणि त्यातच समाधान मानायचे. प्रत्यक्षात हाती लागते ते मोठे शून्य आणि अपेक्षाभंग…!! आणि लक्षात ठेवा अपेक्षाभंगासारखे दुसरे दु:ख नाही. कारण….

आपल्‍याच हलगर्जीपणामुळे म्‍हणा किंवा कामचलाऊ अभ्‍यासामुळे किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे आलेले स्पर्धा परीक्षांतील अपयश आपल्‍या भविष्‍याचा वृक्ष बहरायच्या आधीच उन्मळून टाकते. कारण त्‍याची मुळे खोलवर रूजलेलीच नसतात.

जर स्‍पर्धा परीक्षांतील आपल्‍या यशाची १०० टक्‍के खात्री कोणी दुसराच काय आपणही देऊ शकत नाही. जर आपले प्रयत्‍न प्रामाणिक असतील, त्‍यांचा दर्जा उत्तम असेल तर यश मिळेलच आणि तरीही नशिबाने अपयश आले तरी, आपला आत्‍मविश्वास खचणार नाही. प्रामाणिक प्रयत्‍नांमुळे अंगी बाणला गेलेला आत्‍मविश्वास आपणांस पुन्हा प्रयत्‍न करण्याची प्रेरणा देईल किंवा अन्य क्षेत्रात उभारी घेण्यास आपल्‍याला मदत करेल.

पोलीस भरती यश मिळवायचे तर….

पोलीस भरतीच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे तर इतर स्पर्धक मित्रांच्या, अगदी जीवलग मित्र-मैत्रिणी असले तरी त्‍यांच्या पुढे जावे लागेल. त्यासाठी त्यांच्यापेक्षा अधिक अभ्यास करावा लागेल. अधिक दर्जेदार संदर्भ पुस्‍तके अभ्यासावे लागतील. तरच इतरांच्या पुढे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि हाच आत्मविश्वास आपल्याला यशाच्या समीप नेण्यास मदत करेल.

अभ्यास करताना परीक्षेशी संबंधित परंतु आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्‍टी, आपल्‍या आवडी, छंद, नेहमीचे मित्र-मैत्रिणी, सण-समारंभ यांना काही काळ रजा देऊन, त्‍यामुळे आपल्‍याबद्दल कोणी गैरसमज  करून घेतले तर तेही सहन करून, अहोरात्र प्रयत्न केल्यास कधी-ना-कधी- कोणत्‍या-ना-कोणत्‍या क्षेत्रात यशाची चव चाखता येईल… हे नक्‍की..!

स्पर्धा परीक्षेच्या यशात संदर्भ पुस्‍तकांचा प्रमुख वाटा असतो.  त्‍यामुळे प्रत्‍येकाने सारासार विचार करून, योग्‍य व्यक्‍तींचे मार्गदर्शन घेऊन पुस्‍तके निवडावीत. अभ्‍यास करताना काही पुस्‍तके आवडतील तर काही नाही आवडणार…!!.असे करताना आपला अभ्‍यास अधिक प्रभावीपणे होतच असतो. एकच पुस्‍तक आणि फक्‍त घोकंपट्टी, अशा अभ्‍यासापेक्षा तो अधिक पैलूदार होतो.

कोणतेही यश मिळवायचे तर ते मिळेपर्यंत अहोरात्र कष्ट करावेच लागतील… तेथे कोणत्‍याही युक्‍त्‍या-प्रयुक्‍त्‍या चालत नाहीत. शॉर्टकट काम करत नाहीत. अमुक की, तमूक पासवर्ड काम करत नाहीत….फक्‍त आणि फक्‍त कठोर परीश्रमच करावे लागतात. त्‍यास पर्याय नसतो.

तुका म्हणे एथे, पाहिजे जातीचे ।

येरा-गबाळ्याचे, काम नोहे ।।

तेव्हा आपल्यापैकी काही मित्र वरील मताशी सहमत असू शकतील, काही असणार नाहीत. प्रत्‍येकाच्या  मताचा आदर करून, सर्वांनाच स्‍वत:स योग्‍य वाटेल त्‍या पद्धतीने अभ्यास करून, मनाजोगते यश मिळावे या सदिच्छेसह….

Sharing Is Caring:

VINAYAK GHAYAL M.Sc. Chemistry {Gold medalist}; As an Author untill now He has written and Published 43+  books with K'Sagar Publications,

Leave a Comment

error: Content is protected !!